गुरुपौर्णिमेचे महत्व
Gurupournima Marathi information
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुः साक्षात्परब्रम्ह तस्मै श्रीगुरवे नमः ॥
आषाढ महिन्यात येणार्या पौर्णिमेला आषाढ पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा असे म्हणतात. आपल्या परंपरेत गुरुपूजन अथवा व्यासपूजन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. ही एक वैदिक व अतिशय प्राचीन अशी परंपरा आहे. वस्तुतः वैदिक परंपरेमध्ये ग्रंथपूजन नाही आणि व्यक्तिपूजन सुद्धा नाही. परंतु लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी की, गुरुपूजन मात्र आहे. गुरु म्हणजे श्रेष्ठ अवस्था प्राप्त केलेले शक्तीकेंद्र होय. असल्या शक्तीरुप केंद्राशी साधनेद्वारे एकरुप होणे म्हणजे गुरुपूजन करणे होय. अर्थात् गुरुपूजन म्हणजे गुणांचे पूजन आहे. गुण समाज किंवा व्यक्तिच्या आधाराने राहतात.
व्यास शब्दाचा आशय
आपण जन्म घेतो, मरतो पण विचारच करत नाही की आपला जन्म कशासाठी झाला आहे? आपल्याला कुठे जायचे आहे? या जन्म-मृत्युच्या चक्रात आपण सतत फिरत राहतो. वर्तुळातील सर्वात मोठ्या रेषेला व्यास असे म्हणतात. जे महापुरुष जीवन चक्राच्या ह्या परिघावर फिरता फिरता एका स्थानी स्थिर होतात आणि मी कुठून आलो? कुठे जायचे आहे? हा विचार करून जीवनाच्या ह्या ज्ञान प्राप्तीसाठी परिघाचे एक टोक सोडून मध्यावर वा केंद्रबिंदूवर येतात. केंद्रबिंदूवर आल्यावर ते ज्ञान प्राप्त होते की मी कोण आहे? आम्ही प्रत्यक्ष त्या सर्वशक्तिमान परमात्म्याचेच अंश आहोत. वैदिक परंपरेने शरीर हे आपले उपकरण मानले आहे. हे उपकरण प्रकृतीने आपल्याला दिले आहे. ह्याचा उपयोग कसा केला पाहिजे हे जो जाणतो व अनंताचे ज्ञान प्राप्त करुन परिघाच्या दुसऱ्या टोकावर येतो, व अहंकार रहित होऊन जो ते समाजाला देतो तो गुरु ! तेच व्यास. अशा प्रकारे निरहंकार होऊन हे ज्ञान, सेवा बुद्धीने समाजाला देण्यासाठी जो सतत अनंत परिश्रम घेतो, त्यांना व्यास ही उपाधी दिली गेली आहे. भगवान वेदव्यासांचे खरे नाव कुणालाच माहित नाही. महान पुरुष नावलौकिकाच्या मागे कधीच धावत नाहीत.ते समाजाचे उत्थान करण्यासाठी कार्यरत असतात.अशा सर्व श्रेष्ठ पुरुषांना व्यास ही उपाधी लावणे योग्य आहे. त्यांनी स्वतः प्राप्त केली होती. तो त्यांचा अधिकार आहे.
संतांचा अधिकार
संत कबीर आपल्या एका दोह्यात म्हणतात ‘झिनी झिनी झिनी बिनी चदरिया’. संत कबीर विणकर होते. ते आपल्या शरीराला चादर मानीत असत. झिनी झिनी म्हणजे पारदर्शक. आपल्याला आपले शरीर पारदर्शक वाटत नाही पण त्यांना वाटत होते. ते शरीरात सर्व पाहू शकत होते, म्हणून ते शरीराला उद्देशून म्हणतात, झिनी झिनी झिनी बिनी चदरीया! ही चादर परमेश्वराने अशी तयार केली आहे की सगळे विश्व यातच आहे. ते पुढे म्हणतात ही चादर कशाने बनविली आहे? तर उभ्या आडव्या धाग्यांनी, ताना आणि बाना यांनी. ईडा, पिंगला ताना भरनी । सुषुमन तारसे बिनी चदरिया । आपल्या शरीरात अनेक योग नाड्या आहेत. त्यात प्रमुख तीन योगनाड्या आहेत. डावी नाकपुडी चंद्र किंवा ईडा, उजवी नाकपुडी सूर्य वा पिंगला आणि मधली म्हणजे जेव्हा दोन्ही नाकपुड्यांमधून श्वास वाहतो ती सुषुम्ना नाडी आहे. प्रकृतीने इडा पिंगला सुषुम्नेच्या धाग्यांनी ही शरीररूप चादर विणली आहे. ही चादर तयार करण्यासाठी परमेश्वराला किती वेळ लागला? कबीर जी म्हणतात, ‘साई को सियत मास दस लगे’. आपण मातेच्या उदरातून दहाव्या महिन्यात बाहेर येतो. कशी तयार झाली ही चादर? ‘ठोक ठोककर बिनी चदरिया’ आराम खुर्चीवर बसून हे ज्ञान प्राप्त होत नाही. आपण पाहतो की जेव्हा कापड बनविले जाते तेव्हा त्याला हातमागावर घालून ठोकून ठोकून विणावे लागते. हाच संदर्भ इथे दिला आहे. संत कबीर आता अधिकार वाणीने सांगतात, ही चादर सूर, नर आणि मुनी सुद्धा पांघरतात, ही शरीररुपी चादर सगळ्यांनीच वापरली आहे. सूर म्हणजे देवता व नर म्हणजे मानव आणि ऋषिंनी सुद्धा ! परंतु त्यांनी काय केले?केवळ भोगासाठी वापरुन ती चादर खराब करुन टाकली. आपण सगळे काय करतो, आपण हे शरीर घेऊन येतो पण आपण कोण आहोत, कुठून आलो हे न जाणता या शरीराचा आत्मज्ञानाच्या कार्यासाठी उपयोग न करता, खाणे पिणे आणि मौजमजेत आपले जीवन घालवितो. म्हणून ही चादर खराब झाली आहे. आता संत कबीर आपला अधिकार सांगतात. प्रथम ते स्वतःला दास म्हणवतात, ‘दास कबीर जतनसे ओढी’! परमेश्वराने जशी दिली तशीच मी ठेवली. त्यात जाताना काही खराबी केली नाही. ‘ज्यों की त्यों ही रखा दिनी चदरिया’ ही संत कबीरांची अधिकार वाणी आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज मराठीतील त्यांच्या अभंगात म्हणतात. ‘अधिक देखणे तरी निरंजन पाहणे। योगिराज विनवणे, मना आले ओ माये’॥ आशय असा की, मी हे जग खूप पाहिले आहे.निरंजन म्हणजे जे जड डोळ्यांनी दिसते त्याही पलिकडचे मी सतत पाहतो आहे. माझे जीवन मर्यादित नाही. असे असल्यामुळे मी स्वतःला योगिराज म्हणवून घेत आहे. ते अमर अविनाशी आणि सत्य असे आत्मतत्व मीच आहे.
असे असल्यामुळे व्यासदेखिल अहंकाराने नाही तर अधिकाराने सांगतात की ‘मी व्यास आहे’. मी परमेश्वर कृपेने पूर्ण ज्ञान प्राप्त केलेले आहे आणि आपल्या समोर ठेवत आहे. यात अधिकारही आहे आणि नम्रता सुद्धा ! संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘फोडिले भांडार । धन्याचा तो माल । मी तो हमाल । भार वाही ॥ आम्ही जे ज्ञान आपल्या समोर ठेवतो ते आमचे नाही. अधिकारी पुरुष, साधुसंत आणि ऋषिमुनी याचे मालक आहेत. आम्ही तर फक्त या ज्ञानाची हमाली करत आहोत. जसे स्टेशनवर हमाल येतो आणि आपले सामान उचलून गाडीत ठेवतो. तव्दत् अधिकारी पुरुषांनी मिळविलेले ज्ञान हे मन चिंतन आणि ध्यान करुन प्राप्त करायचे व समाजाला अहंकार रहित होऊन वाटून द्यायचे, त्या मागे कुठलीही अपेक्षा न ठेवता. असे करणे म्हणजे खऱ्या अर्थाने ‘व्यासपूजन’ करणे होय. तिथे संपूर्ण ज्ञान आहे. वैदिक प्रार्थनेमध्ये याचे वर्णन आहे.
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते , पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥
पूर्ण म्हणजे शून्य नव्हे तर पूर्ण म्हणजे संपूर्ण. हे आत्मतत्व अखंड अविनाशी, अमर आणि सर्वशक्तिमान आहे. हे सारे विश्व कधी निर्माण झाले हे कुणालाच माहित नाही. हे सतत राहणारे आहे. कधीच नष्ट होणार नाही. हिच वैदिक परंपरेची विशेषता आहे. वैदिक परंपरा सांगते, ‘अनंत जन्माचे सार्थक म्हणुनी नर जन्म सापडे अवचट’ आम्ही अनेक जन्म पुण्य केले आहे, म्हणून तर मानव जन्माला आलो आहोत.
मानवी शरीर
मानवी शरीराला अन्न खूप कमी लागते. बाकी जनावरे दिवसभर खातच राहतात. मानवी शरीर प्रकृतीने पूर्ण बनविले आहे. ज्या मध्ये आत्मज्ञान प्रकट करण्याचे सामर्थ्य आहे. मग आपण हे शरीर असेच वाया घालवायचे काय? की ज्ञान प्राप्त करायचे ? योग्यांचा आहार जास्त नसतो. अगदी कमी, जेवढे आवश्यक आहे तेवढेच! हत्ती एवढा मोठा प्राणी, त्याचे डोकेही इतके मोठे असते. पण मेंदू मात्र अगदी लहान असतो. मानवी मेंदू खूप मोठा आहे. ही सुविधा प्रकृतीने मानवाला दिली आहे. प्रकृती सांगते की हे मानवा, जीवन चालविण्यासाठी तुला खूप कमी गोष्टींची आवश्यकता आहे. तुला दिवसभर खाण्याची गरज नाही. मुठभर खाऊन तू चोविस तास राहू शकतोस आणि त्या वेळेचा उपयोग तू स्वतःला जाणण्यासाठी करु शकतोस. आपण नवीन गाडी घेतली की तिची पूजा करतो. पण पूजा करून तशीच न ठेवता तिचा उपयोग करतो ना! आणि तशीच ठेवली तर त्या गाडीचा काय उपयोग? तसेच मानवी शरीराचेही आहे. फक्त खाणे-पिणे आणि मौज मजा करण्यासाठी मानवी शरीर प्राप्त झाले आहे काय? त्याचा योग्य उपयोग करायला हवा. शेवटच्या श्वासापर्यंत शरीराचा योग्य कार्याकरिता उपयोग करायला हवा.
एक उदाहरण पाहू. माईक हे विद्युत उपकरण आहे. हे उपकरण आपला आवाज मोठा करते. अशी कर्माच्या द्वारेच कुठलीही अवस्था मोठी होते. म्हणून शरीराशिवाय गुण राहू शकत नाही. यास्तव वैदिक परंपरे मध्ये शरीराचे नव्हे तर गुणांचे पूजन आहे. ‘गुणः पूजा स्थानं । गुणेशु न च लिंगम् न वयः। गुण छोटा असो की मोठा, हे गुणांचे पूजन आहे. जिथे जिथे देहाचे पूजन होते ती अवैदिक परंपरा आहे. आपली वैदिक परंपरा ज्ञानमय परंपरा आहे. विद् म्हणजे जाणणे, ज्ञान प्राप्त करणे. वैदिक म्हणजे ज्ञान प्राप्त करुन तशी आपली जीवन प्रणाली असणे. वैदिक परंपरेत व्यक्तिपूजन नाही. इथे हजारो ऋषि-मुनी झाले आहेत व कुणाच्या नावाने धर्म स्थापन झाला नाही: शरीर नष्ट होते, त्या बरोबर नाव सुद्धा नष्ट होते. परमेश्वर तर सगळीकडे आहे मग आपण याच शरीरावर लक्ष देऊन, त्यावर प्रेम करुन नावाचा आग्रह धरला तर हा स्वतःवरच अन्याय आहे. शरीराबरोबर नावही राहात नाही. आत्मा अमर आहे. कर्म आणि ज्ञान कधीही नष्ट होत नाही. ही अक्षुण्ण ज्ञानाची वैदिक परंपरा आहे. वैदिक परंपरेमध्ये कुणी नावाच्या मागे धावत नाही. उत्तम गुण जिथे एकत्र येतात ते भगवान स्वरुपच आहे. असे मानून तन, मन, धन, बुद्धी, अहंकार हे जो पूर्णपणे समर्पित केले जाते त्यालाच गुरु पूजन म्हणतात ! गुरुला सगळे समर्पित केले आता माझा जवळ काही नाही ही भावना तरी मग कुठे राहते? त्यावर आपण नियंत्रण आणू शकत नाही. मी दिले असा अहंकार सुद्धा नको. गुरूंना सर्व अर्पण करता व पुन्हा माझे कसे होईल याची चिंता सुद्धा करता का? हे कसले समर्पण आहे? निरहंकारी भावनेने तन, मन, धन आणि श्रद्धेने आम्ही जे पूजन करतो त्याला ‘व्यास पौर्णिमा’ असे म्हणतात. हे लक्षात ठेवा की हीच महान वैदिक परंपरा आहे. परमेश्वर कणाकणांत आहे.
भारत देश
आपल्या देशाचे नाव सुद्धा ज्ञानाने परिपूर्ण आहे. ‘भा’ म्हणजे प्रकाश किंवा ज्ञान, जे अज्ञानाचा अधःकार नष्ट करते. ‘रत’ म्हणजे एकरूप होणे. ज्ञानाशी एकरुप झालेले महापुरुष जिथे राहतात, तो आहे भारत देश.अशा महापुरुषांना गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अनेक वेळा ‘भारत’ असे म्हटले आहे. अर्जुनाला सुद्धा ‘भारत’ म्हटले आहे.
आपल्या कुळांची नावे ऋषिमुनींच्या नावावरुन पडली आहे. राजांच्या नावावरुन नाही. हा आहे आपला भारत देश, जिथे ज्ञानाची पूजा होते आणि असेच व्हायला हवे. केवळ सुंदर आहे, ज्याच्या जवळ धन, बंगला, गाड्या आहेत म्हणून त्याची पूजा नाही. ऋषि मुनी तर जंगलात आणि झोपडीत राहत होते. वातानुकुलित घरात नाही. आज जग बदलत चालले आहे. ऋषि मुनींना झोपडीत राहून खायला सुद्धा मिळत नव्हते, परंतु ते हृदयातून खरे होते. अगदी खरे आणि ज्या समाजाला त्यांनी आपले सर्वस्व देण्यासाठी कष्ट घेतले, त्या समाजाने त्यांचाच छळ केला. तरीही त्यांनी नम्रपणे समाजावर प्रेमच केले. म्हणून वैदिक परंपरा सगळ्यात श्रेष्ठ परंपरा आहे.
ही सगळी रचना वेदव्यासांच्या वचनांवर चालत आली आहे. या महान पुरुषाची, तत्वाची, पूजा श्रद्धेने करण्याची परंपरा त्या काळापासून आली आहे. हाच तो दिवस आहे. व्यास पूर्णमासी, म्हणजे संपूर्ण असणे होय. ज्याला पूर्ण ज्ञान प्राप्त झाले आहे, अशा महापुरुषांचे स्मरण करुन आज आपण व्यास पौर्णिमेचा उत्सव साजरा करूया व श्रेष्ठ अशा गुरूंना नमन करूया.