राज्यातील महाविद्यालये 15 फेब्रुवारी पर्यंत बंद | Colleges in the state closed till February 15
कोविड १९ आणि ओमायक्रॉन वाढीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व प्रकारची विद्यापीठे, तंत्रनिकेतन तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील वर्ग आणि परीक्षा १५ फेब्रुवारीपर्यंत फक्त ऑनलाईन पद्धतीने सुरु राहतील, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली.
राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे आणि महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील परीक्षा १५ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन घेण्यात येतील, असेही ते म्हणाले. हा निर्णय सर्व खासगी विद्यापीठांनाही लागू होणार आहे.
हा निर्णय राज्यातील केवळ अकृषी विद्यापीठांनाच नाही तर इतर खासगी विद्यापीठांनाही लागू होणार आहे. सर्व विद्यापीठांनी ऑनलाइन परीक्षा घेण्याचे मान्य केले आहे. परीक्षांमध्ये अडचण आल्यास महाविद्यालये आणि विद्यापीठांना हेल्पलाइन क्रमांक प्रदान करण्याचा सल्ला दिला जातो. कॉलेजसह वसतिगृह बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परदेशातून तसेच इतर राज्यातून संशोधनासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- शिक्षकांना 50 टक्के वर्क फ्रॉम होम असणार.
- सर्व परीक्षा ऑनलाईन घेण्याचे प्रयत्न.
- सर्व वसतिगृह बंद असणार आहे.
विद्यापीठे तसेच महाविद्यालयांनी अद्याप लसीकरण न झालेल्या विद्यार्थ्यांची यादी स्थानिक प्राधिकरणाला देऊन लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवावी. तसेच विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करून तातडीने लसीकरण पूर्ण करून घ्यावे. तंत्रनिकेतनमधील विद्यार्थी 15 ते 18 या वयोगटातील असल्याने व या वयोगटातील व्यक्तीचे लसीकरण सुरू झाले असल्याने संचालक तंत्रशिक्षण यांनी लसीकरण करावयाच्या विद्यार्थ्यांची यादी स्थानिक प्राधिकरणाला उपलब्ध करून द्यावी व विशेष मोहिमेद्वारे लसीकरण पूर्ण करून घावेत. तसेच संचालक कला यांनी ऑनलाईन चित्रकला परीक्षेसंदर्भात नियोजन करुन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेण्यात याव्यात. तसेच विद्यापीठ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची चक्राकार पद्धतीने 50 टक्के उपस्थितीचे नियोजन करण्यात यावे.
परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना येणाऱ्या संभाव्य अडचणी व शंकाचे निरसन करण्यासाठी विद्यापीठ /महाविद्यालयाने हेल्पलाईन व्यवस्था सुरु करावी. परीक्षेची कार्यपद्धती, परीक्षांचा अभ्यासक्रम, नमुना प्रश्नसंच इ. माहिती विद्यापीठांनी त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी.
Get real time update about this post categories directly on your device, subscribe now.