शासकीय इंटरमिजिएट परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाईनच होणार
government intermediate exam will be offline as before
ऑनलाईन परीक्षेमुळे महाराष्ट्रातील गरीब व विशेषतः ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होणार होते. अपुऱ्या इंटरनेट सुविधा, स्पीड यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या असत्या. एलिमेंटरी व इंटरमिजिएट या दोन्ही ड्राईंग ग्रेड परीक्षा २०२१-२२ या ऑफलाईन घेण्याची आवश्यकता होती. त्यामुळे सदर परीक्षा ही जुन्या पध्दतीने ऑफलाईन घेण्यात यावी. तसेच वाढीव शुल्क रद्द करण्याबाबत तातडीने उचित कार्यवाही करावी याबाबत आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री यांना पत्र देण्यात आले होते. त्यानुसार आज अखेर या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होण्याचा निर्णय झाल्याने विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शासकीय इंटरमिजिएट परीक्षा आता एप्रिल महिन्यात म्हणजेच एसएससी बोर्डाची परीक्षा संपल्यानंतर लगेचच ऑफलाईन पद्धतीने घेण्याचे व या परीक्षेसाठी घेण्यात येणारे वाढीव शुल्कही परत करण्याचे आदेश आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागाला दिले.
ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले, परीक्षा फी भरली त्यांना ती फी देखील परत मिळणार आहे. आज मंत्रालयात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासोबत आमदार कपिल पाटील, अभिजित वंजारी, मनिषा कायंदे यांची बैठक पार पडली. यावेळी बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र राज्य कलासंचालयाचे संचालक आणि कला शिक्षक महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य कलासंचालयाने दि. १० फेब्रुवारी २०२२ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार दि. २२ व दि. २३ फेब्रुवारी २०२२ रोजी इ. १० वीत असलेल्या व एलिमेंटरी परीक्षेस पूर्वी पास झालेल्या मुलांना इंटरमिजिएट परीक्षेस बसण्यासाठी संकेतस्थळावर प्रवेशपत्र उपलब्ध केले आहे. सदर परीक्षा ही ऑनलाईन स्वरुपाची असेल असे कळविण्यात आले होते.
दि. १८ जानेवारी २०२२ च्या पत्रानुसार सदर परीक्षा दि. १२ व १३ फेब्रुवारी २०२२ या दिवशी करण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु तांत्रिक अडचणींमुळे ही परीक्षा दि. २२ व दि. २३ फेब्रुवारी २०२२ रोजी होण्याचे कळविण्यात आले होते. परंतु संपूर्ण परीक्षा नेमकी कोणत्या स्वरुपाची होईल याची अद्याप कोणतीही माहिती संकेतस्थळावर उपलब्ध नव्हती, त्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षकांमध्ये गोंधळाचे वातावरण होते.