शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून एकात्मिक आणि द्वैभाषिक धोरण लागू
Integrated and bilingual policy implemented from the academic year 2022-23
शै.वर्ष २०२२-२३ पासून द्वैभाषिक धोरण लागू करण्याचे निर्देश मा.शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.राज्यातील सर्व मराठी माध्यम शाळांत पहिलीपासून एकात्मिक आणि द्वैभाषिक अभ्यासक्रम लागू होणार आहे.
महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांनी मराठीसह इंग्रजीतील संज्ञा आणि संकल्पना स्पष्टपणे समजून घेतल्या पाहिजेत. इंग्रजी शब्द आणि त्यांचा वापर अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी सुरुवातीपासूनच एकात्मिक आणि द्विभाषिक अभ्यास लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासूनच मराठीसोबतच इंग्रजीतील संकल्पना स्पष्ट होण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे २०२२ पासून राज्यातील सर्व मराठी माध्यम शाळांत पहिलीपासून एकात्मिक आणि द्वैभाषिक अभ्यास लागू करण्यात येईल.
विद्यार्थ्यांना मराठीसह इंग्रजी भाषेतील संज्ञा,दैनंदिन शब्द, संकल्पना स्पष्टपणानं समजाव्यात, मराठी शब्दांच्या जोडीला सोप्या इंग्रजीमधील शब्द, वाक्यांचा उपयोग समजावा अशाप्रकारे पाठ्यपुस्तकांची रचना करावी,असे निर्देश राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाना देण्यात आलेले आहेत. पाठ्यपुस्तकांची रचना आकर्षक,जागतिक दर्जाची असावी,असेही निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
सध्या राज्यामध्ये ४८८ आदर्श शाळांत प्रायोगिक तत्वावर पहिलीच्या अभ्यासक्रमात एकात्मिक व द्वैभाषिक पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे. त्या प्रायोगिक तत्वाला मिळालेले यश बघता राज्यभरातील शाळांत या निर्णयाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ पासून करण्यात येईल.