महाराष्ट्र दिवस भाषण मराठी | Maharashtra Day Speech Marathi
सह्याद्रीची छाती ज्याची खानदेश हा माथा
विदर्भ कोकण बाहू आहे चरणी सागर चाहता
नरवीरांच्या भेटी घडती मराठवाडी जाता
जय हिंद भूमी, जय शिव भूमी,भूमी जय महाराष्ट्र गाथा…जय महाराष्ट्र गाथा……
तमाम मावळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा……
महाराष्ट्र म्हणजे आहे तरी काय??????
तर मित्रहो……. पारावरचा वड, देवीचा गड आणि तमाशाचा फड म्हणजे महाराष्ट्र……..आंबा,फणस आणि माणसातले वाघ म्हणजे महाराष्ट्र….. रानातला पळस,अंगणातली तुळस आणि मंदिराचा कळस म्हणजे महाराष्ट्र….. कपाशी,तूर,ज्वारी आणि पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्र…….. इरसाल हस्ती मातीतली कुस्ती आणि राजकारणातील मस्ती म्हणजे महाराष्ट्र…… शिमगा,पोळा,होळी पुरणाची पोळी म्हणजे महाराष्ट्र……
आणि म्हणूनच महाराष्ट्र हा एक जमिनीचा तुकडा नव्हे तर महाराष्ट्र एक संस्कृती आहे एक धर्म आहे महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र आणि इतिहासाच्या पानोपानी ही महानता महाराष्ट्राने वेळोवेळी सिद्ध केलेली आहे.छत्रपती शिवरायांनी याच महाराष्ट्रात स्वराज्याची निर्मिती केली आणि पेशव्यांनी महाराष्ट्राचा हातभर अटकेच्या ही पार रोवला, तर आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके,स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी याच महाराष्ट्रात पारतंत्र्य विरुद्ध सशस्त्र उठाव केला. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी याच महाराष्ट्रात सामाजिक क्रांतीचे बीज रोवले, तर लोकमान्य टिळकांनी याच महाराष्ट्रातून इंग्रजी सत्तेला आव्हान दिले.
आणि मित्रहो……. याच महाराजमहाराष्ट्राचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अवघ्या देशाच्या संविधानाला आकार दिला.महाराष्ट्र म्हणजे ज्ञानोबा-तुकोबांच्या सारख्या संतांची भूमी आहे. याच मातीत कुसुमाग्रज बहिणाबाई आणि फुलं सारखे सारस्वत जन्मले विज्ञानाच्या क्षेत्रातील नारळीकर माशेलकर काकोडकर यांसारखे शास्त्रज्ञ कलेच्या क्षेत्रातील लता मंगेशकर, बालगंधर्व दादासाहेब फाळके यांसारखे कलावंत आणि क्रीडा क्षेत्रातील सुनील गावस्कर,सचिन तेंडुलकर सारखे खेळाडू याच मराठी मातीचे देशाला देण आहे.
सामाजिक सुधारणा व सांस्कृतिक महाराष्ट्राने नेहमीच देशाला वाट दाखविली आहे. आपल्या महाराष्ट्राला त्यागाची,पराक्रमाची आणि देशप्रेमाचे फार मोठी परंपरा आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींना देशकार्यासाठी जेवढे कार्यकर्ते महाराष्ट्रात मिळाले तेवढे इतर कुठेही मिळाले नाहीत म्हणूनच गांधीजींनी महाराराष्ट्राची प्रशंसा ‘कार्यकर्त्यांचे मोहोळ’ या शब्दात केलेली आहे.
आजही देशाच्या औद्योगिक आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राचे नेतृत्व महाराष्ट्राकडेच आहे.सबंध देशाचा आर्थिक आणि औद्योगिक इंजिन म्हणजे महाराष्ट्रच आहे, परंतु मित्रहो, तुमच्या-माझ्या या महाराष्ट्र राज्याची निर्मिती मोठ्या संघर्षाने झालेली आहे.
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी एस एम जोशी, श्रीपाद अमृत डांगे, सेनापती बापट,प्रबोधनकार ठाकरे अशा नेत्यांनी तीव्र संघर्ष केलेला आहे. तर या राज्याच्या निर्मितीसाठी 105 हुतात्म्यांनी बलिदान दिलेल्या आहे. तेव्हा आजचा दिवस हा त्या संघर्षाला आठविण्याचा दिवस आहे.सागरी किनारा, हिरवी राने, सुंदर शेत, दगड, धोंडे यांनी डोंगरांनी वेढलेल्या या महान भूमीला आपल्या जन्मभूमीला नमन करताना महान नाटककार राम गणेश गडकरी म्हणतात……..
राकट देशा, कणखर देशा,दगडांच्या देशा….
नाजूक देशा,कोमल देशा फुलांच्याहि देशा…..
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा…..
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा……
जय हिंद……. जय महाराष्ट्र…….