पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘माझी वसुंधरा’ अभ्यासक्रम
‘Majhi Vasundhara’ course for students of 1st to 8th standard
शिक्षण म्हणजे केवळ शालेय अभ्यासक्रम नसून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक घडविणे याला अधिक महत्त्व आहे. वातावरणीय बदलांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये जागृतीसाठी पर्यावरण विभागाने अतिशय उपयुक्त अभ्यासक्रम तयार केला असून शालेय शिक्षण विभाग त्याची कालबद्ध अंमलबजावणी करून आपली जबाबदारी निश्चित पूर्ण करेल, असे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने युनिसेफच्या साहाय्याने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वातावरणीय बदल म्हणजे नक्की काय, त्याचे परिणाम आणि आपण काय करायला हवे याबाबत माहिती देणारा ‘माझी वसुंधरा’ अभ्यासक्रम तयार केला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या अभ्यासक्रमाची पुस्तके शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्याकडे सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात सुपूर्द केली.
शालेय शिक्षण मंत्री प्रा.गायकवाड म्हणाल्या, पर्यावरण विभागाने माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून अतिशय चांगले उपक्रम राबविले आहेत. वातावरणीय बदलांविषयी भावी पिढीला जागरूक करण्यासाठी शालेय अभ्यासक्रम हा त्यातील अत्यंत उपयुक्त उपक्रम ठरेल. शालेय शिक्षण विभागामार्फत नववीपासून पुढे असा अभ्यासक्रम यापूर्वीच शिकविला जातो. आता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांमध्ये जागृतीसाठी नवीन अभ्यासक्रम मोलाचा ठरेल. शालेय शिक्षण विभागामार्फत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अभ्यासक्रमासाठी समिती कार्यरत आहे. या समितीमध्ये पर्यावरणविषयक तज्ज्ञांचाही समावेश करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण अनिवार्य आहेच, तथापि भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर अडचण येऊ नये यादृष्टीने पहिलीपासून द्वैभाषिक अभ्यासक्रम शिकविण्याचे नियोजन असल्याचेही त्या म्हणाल्या.